केंद्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध कृषी व्यावसायिक संघाचा लाक्षणिक बंद
By admin | Published: February 10, 2016 02:20 AM2016-02-10T02:20:33+5:302016-02-10T02:20:33+5:30
दिवसभर दुकाने ठेवली बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन.
अकोला: केंद्र शासनाने देशभरातील कृषी केंद्रांवर कृषी पदवीधर किंवा डिप्लोमाधारकाला ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाइड्स डिलर्स असोसिएशन उभी ठाकली आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय कृषी केंद्र व्यावसायिकांसोबतच शेतकर्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप अकोला, वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने करीत मंगळवारी शहरासोबतच जिल्हय़ात कृषी केंद्र बंद ठेवून निषेध नोंदविला. दुपारी कृषी व्यावसायिकांनी कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने १५ ऑक्टोबर २0१५ रोजी अधिसूचना काढून, देशभरातील कृषी केंद्रचालकांना खते व कीटकनाशक यांचा नवीन परवाना हवा असेल तर त्यांनी कृषी केंद्रावर बीएस्सी(कृषी) किंवा कृषी डिप्लोमाधारकांना ठेवणे बंधनकारक केले आहे, तसेच जुने परवानाधारक कृषी केंद्रचालकांना दोन वर्षांची मुदत दिली आहे. दोन वर्षांंनंतर त्यांनी परवाना नूतनीकरण करताना बीएस्सी(कृषी) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांना नोकरीवर ठेवण्याची अट घातली आहे.