नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:59 AM2020-08-12T10:59:43+5:302020-08-12T10:59:58+5:30
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या नगररचना विभागातून शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. प्रशासनाने कारवाई न केल्यास नगररचना विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा मिश्रा यांनी दिल्यानंतर उपायुक्त वैभव आवारे यांनी २४ तासांच्या आत दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा प्रशासनाला विसर पडला असून, शिवसेनेचाही कुलूप ठोकण्याचा बार फुसका ठरल्याचे समोर आले आहे.
महापालिकेत २८ जुलै रोजी स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी नगररचना विभागातून बांधकाम परवानगीसाठी सादर केलेल्या फायली गहाळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या नातेवाइकाने बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली फाइल गहाळ झालीच कशी, याप्रकरणी दोषी आढळून येणाºया कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने काय कारवाई केली, असे विविध प्रश्न राजेश मिश्रा यांनी उपस्थित केले होते. फाइल गहाळ झाल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती मनपा उपायुक्त वैभव आवारे यांनी सभागृहामध्ये दिली होती. त्यावर एक महिना उलटून गेल्यावरही प्रशासनाकडून नगररचना विभागातील कर्मचाºयांवर काय कारवाई केली, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित करीत प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने तातडीने दोषी कर्मचाºयावर कारवाई न केल्यास नगररचना विभागाला कुलूप लावण्याचा इशारा राजेश मिश्रा यांनी दिला असता, उपायुक्त आवारे यांनी २४ तासांच्या आत दोषी कर्मचाºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंतही प्रशासनाने दोषी कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई केली नाही, हे येथे उल्लेखनीय.