अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: March 10, 2017 02:37 AM2017-03-10T02:37:03+5:302017-03-10T02:37:03+5:30
सावकार सुरडकर हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अकोला, दि. ९-अवैध सावकारीतून प्रचंड संपत्ती जमवणारा वाशिम बायपास परिसरातील सावकार प्रकाश दत्तुजी सुरडकर याच्याविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. सावकार सुरडकर हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीनुसार अवैध सावकारी करणारा प्रकाश सुरडकर याच्याविरुद्ध गोपनीय तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रकाश सुरडकर याच्या वाशिम बायपास परिसरातील घरात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नियुक्त केलेल्या पथकाने बुधवारी छापा घातला. छाप्यामध्ये त्याच्या घरातून सहाशे ग्रॅम सोने, चांदी आणि कर्जदारांच्या शेतजमिनीशी संबंधित १८ खरेदी खत, नऊ पासबुक, एटीएम कार्ड आणि कर्जाच्या नोंदवहय़ांसह दीड लाखांची रोख रक्कम जप्त केली होती. यावरून सुरडकर हा विनापरवाना अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाले. उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी प्रकाश सुरडकर याच्याविरुद्ध अवैध सावकारी अधिनियम २0१४ कलम ३९ नुसार गुन्हा दाखल केला.
सावकाराच्या घरातून पिस्तूल, काडतूस जप्त
अवैध सावकारी करणारा प्रकाश सुरडकर हा अनेक वर्षांपासून अवैधरीत्या सावकारीचा व्यवसाय करीत होता. त्यासाठी त्याने पिस्तूल व काडतूससुद्धा खरेदी केले होते. त्याच्या घरातील छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतूससुद्धा पोलिसांनी जप्त केले.
परवाना नसतानाही करायचा सावकारी व्यवसाय
सुरडकर याच्याकडे सावकारी व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. असे असतानाही तो लोकांना कर्ज द्यायचा. त्या बदल्यात त्यांची शेती, प्लॉट लिहून घ्यायचा. एवढेच नाही तर अनेकांकडून सोने, दागिनेसुद्धा ठेवून घ्यायचा आणि चक्रीवाढप्रमाणे कर्जदारांकडून बळजबरीने व्याज वसूल करायचा. प्रसंगी कर्जदारांना पिस्तूलचा धाकही दाखवायचा.