बार्शिटाकळी येथे उपोषणकर्त्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:54+5:302021-08-25T04:24:54+5:30
बार्शिटाकळी : शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे यासह विविध मागण्या करीत तालुक्यातील रुस्तमाबाद येथील रहिवासी नामदेव तुकाराम काळे यांनी ...

बार्शिटाकळी येथे उपोषणकर्त्यावर गुन्हा दाखल
बार्शिटाकळी : शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे यासह विविध मागण्या करीत तालुक्यातील रुस्तमाबाद येथील रहिवासी नामदेव तुकाराम काळे यांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यास समजाविण्यासाठी गटविकास अधिकारी किशोर काळपांडे व ग्रामसेवक प्रशांत क्षीरसागर हे उपोषण मंडपात गेल्याने त्यांना उपोषणकर्ते नामदेव काळे यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणात गटविकास अधिकारी काळपांडे व ग्रामसेवक क्षीरसागर यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपोषणकर्ते नामदेव काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील रुस्तमाबाद गावात सार्वजनिक हातपंपाजवळ बांधलेले शौचालय बंद करावे, शासकीय रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी नामदेव काळे यांनी पंचायत समिती, सचिव, ग्रामपंचायत रुस्तमाबाद यांना निवेदन सादर केले. मागणी पूर्ण न झाल्याने काळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यास समजाविणास उपोषण मंडपात गेलेले गटविकास अधिकारी किशोर काळपांडे व ग्रामसेवक प्रशांत क्षीरसागर यांना उपोषणकर्ता नामदेव काळे रुस्तमाबाद व त्यांचा सहकारी सारंगधर श्यामराव तराळे (रा. पाटखेड) यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी गटविकास अधिकारी किशोर काळपांडे व रुस्तमाबादचे ग्रामसेवक प्रशांत क्षीरसागर यांनी बार्शिटाकळी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नामदेव काळे, सारंगधर तराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------------------------------
उपोषण गैरकायदेशीर !
उपोषणकर्ते काळे यांचे बेमुदत उपोषण गैरकायदेशीर आहे. त्यांनी उपोषणाची परवानगी पोलीस स्टेशन तसेच नगरपंचायतकडून घेतली नाही. त्यांच्या मागणीप्रमाणे नजुलचा नकाशा प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमणाबाबत कारवाई करू, तसेच स्वच्छतालयाच्या विषयांबाबत पाण्याचे नमुने चांगले आले आहेत.
- प्रशांत क्षीरसागर, ग्रामसेवक, ग्राम पंचायत, रुस्तमाबाद
--------------------------------
मी आणि ग्रामसेवक क्षीरसागर उपोषणकर्त्यांची समजूत घालण्याकरिता गेलो असता उपोषणकर्ता नामदेव काळे व त्यांचा सहकारी शारंगधर तराळे यांनी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
- किशोर काळपांडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बार्शिटाकळी