प्रकाश पोहरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:44+5:302021-04-08T04:18:44+5:30
सिव्हील लाईन्स रोडवरील दुकाने उघडणे भोवले अकोला : राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने ...
सिव्हील लाईन्स रोडवरील दुकाने उघडणे भोवले
अकोला : राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही एका वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांनी बुधवारी सिव्हील लाईन्स रोडवरील दुकाने उघडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नेकलेस रोडवरील एम. आर. शोरूम हे कापडाचे दुकान उघडण्याचा प्रयत्न प्रकाश पोहरे यांनी बुधवारी केला. ज्यावेळी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी पोलिसांना न जुमानता दुकानाचे शटर उघडून इतरही व्यापाऱ्यांना लाॅकडाऊनचे पालन न करण्याचे आवाहन केले, तसेच पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी सर्वांनी त्यांची प्रतिष्ठाने उघडण्याचे आव्हान केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकाश पवार यांच्याविरुद्ध सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.