जमिनी बळकावणाऱ्या सावकारांवर गुन्हे दाखल करा!

By admin | Published: June 1, 2017 01:43 AM2017-06-01T01:43:40+5:302017-06-01T01:43:40+5:30

विद्या चव्हाण यांच्यासह सावकारग्रस्त शेतकऱ्यांची ‘डीडीआर’ कार्यालयात धडक

Filing criminal cases against lenders! | जमिनी बळकावणाऱ्या सावकारांवर गुन्हे दाखल करा!

जमिनी बळकावणाऱ्या सावकारांवर गुन्हे दाखल करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक देत, अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तातडीने परत करून सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार विद्या चव्हाण, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) बुधवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांच्यासह जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांच्याशी चर्चा केली. अवैध सावकारीतून सावकारांनी शेतकऱ्यांच्या बळकावलेल्या जमिनीच्या प्रकरणांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याबाबत आदेश पारित करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप जमिनी परत मिळाल्या नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये भर पडू नये, यासाठी अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेल्या जमिनी तातडीने शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या आणि संबंधित अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली.

आदेश होऊनही कारवाई नाही !
अवैध सावकारीतून बळकावलेली जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिला ; मात्र त्यावर अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जमीन अद्याप ताब्यात मिळाली नसून, संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी व्यथा गोरेगाव येथील सावकारग्रस्त शेतकरी रामेश्वर वाकोडे यांनी यावेळी मांडली, तसेच अवैध सावकारीतून सावकाराने घेतलेली दोन एकर शेती अद्याप परत मिळाली नसल्याची तक्रार कसुरा येथील आशा प्रकाश खंडारे यांनी यावेळी केली. अशाच प्रकारच्या व्यथा इतर सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या.

मोर्चात अवैध सावकारच सहभागी!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवैध सावकारांविरोधातील मोर्चामध्ये रायुकाँचा पदाधिकारी असलेला एक अवैध सावकारच सहभागी झाल्याने मोर्चातील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. अवैध सावकारीचा व्यवसाय करून एकाची लुबाडणूक केल्याप्रकरणी मंगळवारी रामदासपेठ पोलिसांनी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जयंत सहारे यांच्या तक्रारीनुसार गौरव अशोक शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गौरव शर्मा बुधवारी अवैध सावकारांविरुद्धच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शर्मा याच्यावर फसवणुकीसोबतच व्यापाऱ्याला मारहाण केल्याचे गुन्हेदेखील दाखल आहेत. अवैध सावकारीच्या माध्यमातून त्याने अनेकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून चक्रीवाढ पद्धतीने व्याजासह रकमेची वसुली करून धमक्या दिल्याचेही आरोप आहेत.

अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी करणार!
अवैध सावकारीतून सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक आणि तालुका उपनिबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे, असेही आ. विद्या चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश!
अवैध सावकारीतून शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याचे स्पष्ट झालेल्या १४ प्रकरणांत संबंधित अवैध सावकारांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांनी जिल्ह्यातील सहायक निबंधक व तालुका उपनिबंधकांना यावेळी दिला.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा द्या!
अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तातडीने परत करण्यात याव्या, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सावकारग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी आ. विद्या चव्हाण यांच्यासह सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

सावकारी अधिनियमांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत आणि संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.
- आ. विद्या चव्हाण

Web Title: Filing criminal cases against lenders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.