बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:13 AM2017-12-11T02:13:26+5:302017-12-11T02:13:43+5:30
विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे सरपंचांनी केली होती. त्याचा राग मनात धरून सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड: विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे सरपंचांनी केली होती. त्याचा राग मनात धरून सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे आणि परिसरातील गावातील सरपंच आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या दिला आहे. प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून सरपंच आणि संबंधित महिलांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दुपारी चार वाजल्यापासून हे ठिय्या आंदोलन सुरू असून, रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते. जांब येथील सरपंचांनी सदर महिला ह्या देशी दारूच्या अवैध विक्रीचा व्यवसाय करत असून, या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी स्थानिक पोलिसात ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली, याचा राग मनात ठेवून संबंधित महिलांनी रविवारी सकाळी सरपंचास ईल शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशा आशयाची तक्रार सरपंच संजय सोनुने यांनी पोलिसात दिली आहे. दहा डिसेंबर रोजी तक्रारकर्त्या महिलांपैकी एकीचा घरासमोरून जात असताना संजय किसन सोनुने यांनी हात धरला तथा ईल हावभाव करत विनयभंग केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच आ. राहुल बोंद्रे, रिझवान सौदागर, प्रभाकर वाघ, देवीदास सुसर, परिसरातील विविध गावाचे सरपंच व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात धडकले.
तक्रारकर्त्या महिलांवर देशी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि सरपंचांनी दारू विक्रीवर बंदी आणण्यासाठी निवेदन दिले म्हणून त्यांच्याविरुद्ध महिलांनी ही तक्रार दिली. जोवर सरपंचावरील दाखल गुन्हे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार
- राहुल बोंद्रे,
आमदार, चिखली
पोलिसांनी दोन्ही बाजूची तक्रार ऐकून त्यांची नोंद घेत गुन्हे दाखल केले आहे.
- बी.बी. महामुनी
पोलीस उपविभागीय अधिकारी, बुलडाणा.