कचऱ्यातून निघणाऱ्या सोन्यावर भरते त्यांचे पोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:59+5:302021-09-27T04:19:59+5:30
अकोला : ‘सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो’ ही जुनी म्हण आहे. त्याची प्रचिती सराफा बाजारात साफसफाई करणाऱ्या ...
अकोला : ‘सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो’ ही जुनी म्हण आहे. त्याची प्रचिती सराफा बाजारात साफसफाई करणाऱ्या झारीवाल्या महिलांना नेहमी येते. शहरातील सर्व लहान-मोठ्या सोन्या-चांदीच्या दुकानात त्या १०-१५ महिला मोफत झाडू मारतात. एवढेच नव्हे, तर झाडलेला कचरा टाकून न देता त्या सोबत घेऊन जातात. त्या कचऱ्यातून शोधून काढलेले सोने विकून त्या महिला आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे.
या महिलांना झारेकरी असे म्हटले जाते. या महिला सराफाच्या दुकानात झाडू मारतात. कचऱ्याची जमा झालेली माती एका एका लोखंडी घमेल्यात टाकतात. नंतर त्या मातीला पाण्याने धुतात. तेव्हा त्या महिलांच्या नजरेतून सोने जास्त वेळ मातीत लपून राहात नाही. या सोन्याच्या भरवशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
कचऱ्याच्या मातीतून किती मिळते सोने?
प्रत्येक आठवड्याला १०० ते ३०० मि.ग्रॅ. पर्यंत सोने कचऱ्यातून मिळते. ते शुद्ध सोने नसते. सोनाराच्या दुकानात घडविलेल्या किंवा वितळविलेल्या दगिन्यांतील काही अंश मातीत पडतो.
- ज्योती मडावी
दुकान उघडण्याआधी सोनाराच्या दुकानापुढील कचरा वेचतो. तो घरी आणून आठवड्याला, सणाच्यावेळी किंवा वर्षातून एखाद्यावेळेस त्यातून सोने काढल्या जाते.
- सोनाबाई पचपुरे
एका आठवड्यातून मातीतून सोने-चांदी काढल्या जाते. यामधून १ हजार ते ५ हजारपर्यंत पैसे मिळतील एवढे सोने प्राप्त होते. त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
- निर्मला मडावी
झारेकऱ्यांची ही पिढ्यांपिढ्यांपासून परंपरा
झारेकरी सराफा बाजारातील प्रत्येक सोनाराचे दुकान झाडून काढतात. त्यांची ही परंपरा मागील दोन पिढ्यांपासून सुरू आहे. सराफा बाजारातील कारागिरांचा कचरासुद्धा ते झाडून नेतात. त्यातून सोने काढून त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहतो.
- शैलेश खरोटे, सराफा व्यावसायिक
शहरातील नदीकाठच्या भागात हे झारेकरी राहतात. ते दररोज शहरातील सोन्या-चांदीच्या दुकानासमोरील कचरा झाडून उचलून आणतात. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा हाच व्यवसाय सुरू आहे.
- रमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता