बीएसएफ जवान पराग महाले यांना अंतिम निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:12+5:302021-01-18T04:17:12+5:30
अकोला : स्थानिक जवाहरनगरमध्ये राहणारे बीएसएफ जवान पराग भास्करराव महाले (वय ५०) यांचे शनिवारी, १६ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने ...
अकोला : स्थानिक जवाहरनगरमध्ये राहणारे बीएसएफ जवान पराग भास्करराव महाले (वय ५०) यांचे शनिवारी, १६ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील उमरी परिसरातील स्मशानभूमीत रविवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार वेळी पोलीस खाते अकोला, जिल्हा सैनिक बोर्ड अकोला, उपविभागीय कार्यालय अकोला यांच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून, तसेच बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली.
पराग महाले ५३ बटालियन बीएसएफ (सीमा सुरक्षा दल, गृहमंत्रालय) हे जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील भेंडी महल गावचे रहिवासी असून, सध्या ते अकोल्याच्या जवाहरनगर कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. ते दांतीवाडा गुजरातमध्ये सहायक कमांडर होते. गेल्या एक वर्षभरापासून ते आजारी होते. शनिवारी जवाहरनगर येथील त्यांनी घरी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी त्यांच्यावर उमरी परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, पोलीस निरीक्षक मडावी, तहसीलदार विजय लोखंडे आणि भारतीय माजी सैनिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अखेरचे दर्शन घेतले. यावेळी महाले कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त जवाहर नगरसह भेंडी महालचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)