किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:05 PM2018-08-17T14:05:31+5:302018-08-17T14:05:39+5:30
अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.
अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी युक्तिवाद करताना दोन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विश्वासपात्र असल्याचे न्यायालयासमोर सांगितले, तर सोमठाणाचे पोलीस पाटील यांनी बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना योग्य ते उत्तर न दिल्याने त्यांनी खोटा पुरावा दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सरकारी पक्ष न्यायालयात बाजू मांडणार आहे. या हत्याकांडाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे.
शहरातील प्रतिष्ठित उद्योजक किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २०१५ रोजी आर्थिक वादातून सोमठाणा शेतशिवारात गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा आरोप रणजितसिंग चुंगडे, रूपेशसिंह चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी व राजू मेहरेवर आहे. किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी युक्तिवाद करताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी दोन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे विश्वासपात्र असल्याचे न्यायालयाला सांगून त्यांनी जस्सी व रणजितसिंग चुंगडे यांना घटनास्थळावर पाहिल्याचे सांगितले. आरोपींची दहशत यामुळे दोन्ही साक्षीदारांनी उशिरा बयान दिल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगून सोमठाणा येथील पोलीस पाटील यांनी मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादादरम्यान हो हो म्हणून खोटा पुरावा दिल्याचे निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पोलीस पाटील यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम कामकाज पाहत असून, आरोपींच्यावतीने अॅड. वसीम मिर्झा, अॅड. दिलदार खान, अॅड. प्रदीप हातेकर कामकाज पाहत आहेत.