उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:54 PM2019-06-19T12:54:13+5:302019-06-19T12:54:24+5:30
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी निवडणूक निरीक्षक (खर्च विषयक) नागेंद्र यादव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी निवडणूक निरीक्षक (खर्च विषयक) नागेंद्र यादव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली असून, निवडणूक खर्चाची अंतिम माहिती सादर करण्याची मुदत २१ जूनपर्यंत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांनी निवडणूक लढविली असून, निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी ३० दिवसांत निवडणूक खर्चाचे अंतिम विवरण सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने १८ जूनपर्यंत १० उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या निवडणूक अंतिम खर्चाची पडताळणी निवडणूक निरीक्षक नागेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, संतोष सोनी यांच्यासह उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक लढविलेल्या ११ पैकी १० उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चाच्या अंतिम माहितीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, बसपाचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक)चे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष प्रवीण कौरपुरिया, अपक्ष मुरलीधर पवार व अपक्ष सचिन शर्मा इत्यादी १० निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक खर्चाची अंतिम माहिती एक-दोन दिवसात सादर करण्यात येणार आहे.
दहा उमेदवारांकडून सादर करण्यात आलेला असा आहे निवडणूक खर्च!
अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेल्या ११ पैकी १० उमेदवारांकडून मतमोजणीपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची अंतिम माहिती सादर करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे -५२ लाख ४९ हजार ५०७ रुपये, काँग्रेसचे हिदायत पटेल -४७ लाख ३१ हजार २०७ रुपये, बसपाचे बी.सी. कांबळे -९४ हजार ५३० रुपये, पिपाइंचे अरुण वानखडे -१ लाख ३२ हजार ८३७ रुपये, बमुपाच्या प्रवीणा भटकर -२ लाख ८५ हजार ६१ रुपये, अपक्ष गजानन हरणे -३३ हजार ९६० रुपये, अपक्ष अरुण ठाकरे-२८ हजार ९५ रुपये, अपक्ष प्रवीण कौरपुरिया -३९ हजार ८५९ रुपये, अपक्ष मुरलीधर पवार-२९ हजार ९३२ रुपये आणि अपक्ष सचिन शर्मा यांनी ७१ हजार ९८६ रुपयांचा निवडणूक खर्च सादर केला आहे.