अखेर १५ दिवसांनंतर कविता द्विवेदी महापालिकेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:43+5:302021-09-17T04:23:43+5:30
नगरविकास विभागाने २९ जानेवारी राेजी मनपाच्या आयुक्तपदी निमा अराेरा यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला हाेता. अराेरा यांनी ३ फेब्रुवारी ...
नगरविकास विभागाने २९ जानेवारी राेजी मनपाच्या आयुक्तपदी निमा अराेरा यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला हाेता. अराेरा यांनी ३ फेब्रुवारी राेजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच १३ जुलै राेजी शासनाने त्यांची जिल्हाधिकारीपदी बदली केली. यादरम्यान मनपाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभारही अराेरा यांच्याकडेच हाेता. १ सप्टेंबर राेजी नगरविकास विभागाने रिक्त आयुक्तपदावर कविता द्विवेदी यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. तत्पूर्वी शासनाच्या दाेन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपाकडे पाठ फिरवल्यामुळे द्विवेदी मनपात रुजू हाेणार की नाही, याबद्दल संभ्रमाची स्थिती हाेती. अखेर पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर कविता द्विवेदी यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, प्रशांत राजुरकर, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, नगरसचिव तथा आरोग्य विभागप्रमुख अनिल बिडवे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित हाेते.
निमा अराेरा यांनी दिला कानमंत्र?
मनपात गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी निमा अराेरा, कविता द्विवेदी दाखल झाल्या. यादरम्यान दाेन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे पाऊण तास खलबते पार पडली. उण्यापुऱ्या सात महिन्यांच्या कालावधीत निमा अराेरा यांनी प्रशासनाची गाडी रुळावर आणली. सत्ताधाऱ्यांसह प्रशासनातील अनेकांच्या नाड्या ओळखून मनपाच्या हितासाठी कठाेर निर्णय घेतले. त्यामुळे पदभार देताना जिल्हाधिकारी अराेरा यांनी नवनियुक्त आयुक्तांना नेमका काेणता कानमंत्र दिला, याबद्दल चर्चा रंगली आहे.
विभागप्रमुखांसाेबत संवाद
पदभार स्वीकारताच आयुक्त कविता द्विवेदी यांनी सर्व विभागप्रमुखांसाेबत संवाद साधला. विभागातील कामकाजाची माहिती व काही अडचणी असतील तर त्या लेखी स्वरूपात लिहून देण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.