...अखेर ‘सर्वोपचार’ प्रशासनाला आली जाग!
By admin | Published: April 18, 2017 08:25 PM2017-04-18T20:25:08+5:302017-04-18T20:25:08+5:30
अकोला- सर्वोपचार रुग्णालयातील सर्व कक्षांमधील कुलरमध्ये पाणी टाकून ते सुरू करण्यात आले असून, अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
वॉर्डांमधील कुलर सुरू : वातानुकूलन यंत्रांचीही दुरुस्ती
प्रभाव लोकमतचा
अकोला : शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअस पार गेले असतानाही येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा व कुलर बंदच असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणताच सर्वोपचार प्रशासनाला खळबळून जाग आली. रुग्णालयातील सर्व कक्षांमधील कुलरमध्ये पाणी टाकून ते सुरू करण्यात आले असून, अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतानाही रुग्णांना सुविधा मिळत नसल्याची येथे नेहमीच ओरड होते. उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. अशा कडक उन्हाळ्यात सर्वोपचार रुग्णालयातील कुलर पाण्याअभावी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत, तसेच अतिदक्षता विभागातील नऊपैकी केवळ दोन वातानुकूलन यंत्र सुरू आहेत. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे वृत्त ‘लोकमत’ने सोमवार, १७ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने सर्व कक्षांमधील कुलर पाणी टाकून सुरू करण्याचे आदेश संबंधितांना दिले. कुलरमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी कक्ष सेवकांची असतानाही ते टाळाटाळ करीत असल्यामुळे या कामासाठी एका जणाची व्यवस्था करण्यात आली, तसेच अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रे दुरुस्तीचे कामही संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. लवकरच ही यंत्रे दुरुस्त करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.