अखेर मेडिकल स्टाेअर्सला परवानगी; पेट्राेल पंपांवर सर्वांना मिळेल इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:34+5:302021-02-24T04:20:34+5:30
अकाेला : जिल्ह्यासह शहरातील मेडिकल स्टाेअर्स सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशात मंगळवारी बदल करण्यात आला. ...
अकाेला : जिल्ह्यासह शहरातील मेडिकल स्टाेअर्स सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशात मंगळवारी बदल करण्यात आला. ‘लाेकमत’मधील वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मेडिकल स्टाेअर्स नियमित वेळेत सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला. तसेच शहरातील पाच पेट्राेल पंप वगळता इतर सर्व पंप सकाळी सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी दिली. या निर्णयामुळे औषधी विक्रेत्यांसह पेट्राेल पंप चालकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यासह शहरात काेराेना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी रात्री ८ वाजता पासून ते साेमवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली हाेती. यादरम्यान, काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारी राेजी सायंकाळी आदेश जारी केला. यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येऊन मेडिकल स्टाेअर्स सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत तसेच हाॅटेल, रेस्टाॅरन्टला सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली हाेती. या आदेशामुळे दुपारी तीननंतर एखाद्या आजारी व्यक्तीला औषधी खरेदी करण्यासाठी शहरातील दाेन महागड्या मेडिकल स्टाेअर्सशिवाय पर्याय नव्हता.
जिल्हाधिकारी म्हणाले स्टाेअर्स सुरू हाेतील!
गरजू रुग्णांची औषधी खरेदी करताना दमछाक हाेणार नाही, त्यामुळे औषधी विक्रीची सर्व दुकाने पूर्ववत सुरु ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना साेमवारी रात्री ‘लाेकमत’ने विचारणा केली असता मेडिकल स्टाेअर्स सुरू हाेतील,तसा सुधारित आदेश जारी करू, असे त्यांनी स्पष्ट केले हाेते.
पाच पेट्राेल पंपांना १२ तास मुभा
शहरातील पाच पेट्राेल पंपांच्या व्यतिरिक्त इतर सर्व पंप बंद ठेवण्याचा आदेश हाेता. त्यामुळे मंगळवारी सकाळी पाच पंपांवर इंधन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. याविषयी पेट्राेल पंप डिलर असाेसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांच्यासह इतर व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थिती विशद केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘त्या’ पाच पंपांना सकाळी ८ ते रात्री आठ व इतर सर्व पंपांना सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश जारी केला.
कारवाई संशयाच्या भाेवऱ्यात
जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी ३ पर्यंत सर्वच पेट्राेल पंप सुरु ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे व्यावसायिकांनी पंप सुरु केले. पंप सुरु करताच अवघ्या दहा मिनिटांत जिल्हा प्रशासन व मनपाच्या संयुक्त पथकाने अशाेक वाटिका चाैकातील पंपावर धाव घेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. त्यापूर्वी सकाळपासून सुुरू असलेल्या पंपांवर ग्राहकांची ताेबा गर्दी उसळली हाेती. त्या ठिकाणी कारवाई झाल्याची माहिती नाही.