अखेर रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:35 AM2017-11-16T02:35:45+5:302017-11-16T02:38:47+5:30
रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाची ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडल्याने मनपा प्रशासनाने कंपनीला बारा लाखांचा दंड ठोठावला होता; परंतु दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्या कंपनीविरुद्ध मनपा प्रशासनाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. खदान पोलिसांनी रात्री उशिरा रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाची ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडल्याने मनपा प्रशासनाने कंपनीला बारा लाखांचा दंड ठोठावला होता; परंतु दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्या कंपनीविरुद्ध मनपा प्रशासनाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. खदान पोलिसांनी रात्री उशिरा रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कौलखेड, खडकी परिसरात रिलायन्स कंपनीने फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करताना करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी शहराला पाणी पुरवठा करणारी ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाणीसुद्धा वाहून गेले होते. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनी दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि पाण्याच्या अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये असा एकू ण बारा लाखांचा दंड आकारला होता. दीड महिना उलटून गेल्यानंतरही रिलायन्स कंपनीने मनपाकडे दंडाची रक्कम जमा केली नाही. दंडाची रक्कम जमा करण्यास रिलायन्स कंपनी टाळाटाळ करीत होती, तसेच मनपा प्रशासनाकडूनही कंपनीला कोणताही जाब विचारण्यात येत नसल्याने, मनपाच्या अधिकार्यांच्या कार्यशैलीवर भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी आरोप केला होता. ‘लोकमत’नेसुद्धा बुधवारी रिलायन्स कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे झोपेतून जागे झालेल्या मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, कनिष्ठ अभियंता नरेश बावणे यांनी बुधवारी सायंकाळी रिलायन्स कंपनीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनुसार खदान पोलिसांनी रात्री उशिरा कंपनीविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४ आणि कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले करणार आहेत.