अखेर ४७ लाख जमा केले; शहर बस सेवा सुरू!
By admin | Published: February 25, 2017 02:19 AM2017-02-25T02:19:52+5:302017-02-25T02:19:52+5:30
अकोलेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
अकोला, दि. २४- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोलेकरांच्या सेवेत पाच शहर बसेस दाखल झाल्यानंतर 'आरटीओ'कडून परमिट देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. यापूर्वीच्या बसेसची थकबाकी जमा करा त्यानंतरच बस सेवेला परवानगी देण्याची भूमिका आरटीओने घेतली होती. महापालिकेने थकबाकीचे ४७ लाख रुपये जमा करताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सिटी बसच्या परवानगीचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपासून सिटी बस सेवा सुरू झाली. यामुळे अकोलेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बस वाहतूक सेवेची गरज ओळखून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाच्या सोयीचा करारनामा तयार करून निविदा अर्ज बोलावले. यामध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स नागपूरच्या वतीने सर्वाधिक २ रुपये ११ पैसे प्रति किलोमीटर दराची निविदा प्रशासनाने मंजूर केली. संबंधित कंपनीकडून मनपाला वार्षिक ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल. जानेवारी महिन्यात बस सेवा सुरू करण्याचा दावा संबंधित कंपनीने केला होता. जानेवारीत शहरात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसला उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने परमिट मंजूर करण्यास आखडता हात घेतला होता. आरटीओच्या नियमानुसार यापूर्वी बंद पडलेल्या सिटी बसेसची थकीत रक्कम मनपा प्रशासनाने जमा न केल्यामुळे नवीन बसेसला परमिट मिळण्यास विलंब झाला होता. ही रक्कम (४७ लाख) आठवडाभरापूर्वी मनपाने जमा केल्यानंतर शहर बस सेवेला परवानगी मिळाली. मागील दोन दिवसांपासून सिटी बस धावत आहेत.