अखेर काँग्रेसचा तिढा सुटला
By admin | Published: March 19, 2015 01:31 AM2015-03-19T01:31:34+5:302015-03-19T01:31:34+5:30
प्रदेशाध्यक्षांचा निर्णय; अकोला महापालिकेच्या गटनेतेपदी साजीद खान.
अकोला: महापालिकेत काँग्रेसच्या गटनेता निवडण्याचा तिढा अखेर बुधवारी सुटला. गटनेते पदाची धुरा विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यावर सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी गटनेता पदासाठी साजीद खान यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. गटनेतेपदाचा तिढा सुटताच काँग्रेसने स्थायी समितीची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गटनेता पदाची शिफारसवजा प्रस्ताव विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे सादर केला. मनपात स्थायी समितीच्या पुनर्गठनासाठी राजकीय पक्ष, गठित केलेल्या विविध आघाडीच्यावतीने नव्याने गटनेता पदाची निवड करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस पक्ष वगळता इतर राजकीय पक्ष व आघाड्यांनी गटनेत्याची निवड करीत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. यामध्ये विभागीय आयुक्तांनी सात गटनेत्यांची निवड केली, तर काँग्रेसमध्ये गटनेता निवडीवरून शीतयुद्ध रंगले. गटनेता पदाचा वाद थेट प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या दालनात पोहोचला. हा वाद आपसात चर्चा करून सोडण्यास प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. मात्र, कोणताही निर्णय स्थानिक पदाधिकार्यांना घेता न आल्याने अखेर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी गटनेता पदाची धुरा विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यावर सोपवविण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश त्यांनी बुधवारी काढल्याने काँग्रेसमधील तिढा सुटला आहे. गटनेता पदाची निवड होताच शहर अध्यक्ष मदन भरगड यांच्यासह सर्व नगरसेवकांनी गटनेता निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला.