अखेर गांधी रोडवरील अतिक्रमकांना हुसकावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 02:10 AM2015-12-30T02:10:22+5:302015-12-30T02:10:22+5:30
बालाजी मॉलला २0 हजारांचा दंड.
अकोला: शहरवासीयांना अतिक्रमणाचा सर्वाधिक त्रास गांधी रोडवरील जैन मंदिर परिसर तसेच खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या परिसरात होतो; मात्र या भागातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण मनपा प्रशासनाने स्वीकारल्याचे चित्र होते. अकोलेकरांच्या भावना लक्षात घेता, ह्यलोकमतह्णने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी तातडीने या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जारी केले. मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासह अतिक्रमण विभागाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी बालाजी मॉलकडून २0 हजार रुपये दंड वसूल केला. मनपा प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यावर ठाण मांडणार्या अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई दररोज होत आहे. यामध्ये गांधी रोड, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतचा मुख्य रस्ता वगळता, इतर भागांमध्ये अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ शहराच्या मध्यवर्ती भागात एकवटली आहे. खुले नाट्यगृह परिसर ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर कापड बाजाराची मोठी बाजारपेठ आहे. गांधी रोडवर रेडीमेड कपड्यांसह विविध गृहपयोगी वस्तूंची विक्री होते, तर जैन मंदिर परिसरात जुना भाजीबाजार, किराणा बाजार असल्याने या ठिकाणी सतत वर्दळ राहते. साहजिकच, वस्तूंच्या खरेदीसाठी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. मुख्य रस्त्यांसह मनपाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण कायम आहे. शहरवासीयांना अतिक्रमणाचा सर्वाधिक त्रास या परिसरात होतो. साहजिकच, मनपाकडून या भागात कारवाई करणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या तक्रारींना ह्यलोकमतह्णने वाचा फोडल्यानंतर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जारी केले. मंगळवारी सायंकाळपर्यंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने गांधी रोड, जैन मंदिर परिसर, मोहम्मद अली मार्गालगतच्या अतिक्रमकांना हुसकावून लावले.