अखेर जीएमसीतील ३६ पैकी चार व्हेंटिलेटर कार्यान्वित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:54 PM2020-07-18T12:54:25+5:302020-07-18T12:54:33+5:30
अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारकडून प्राप्त ३६ व्हेंटिलेटरपैकी काही व्हेंटिलेटर अखेर कार्यान्वित करण्यात आले आहेत. आधी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने, तर नंतर व्हॉल्व्ह जुळत नसल्याने एक महिना उशीर झाला होता. अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात अकोल्याचाही समावेश असून, शनिवार २० जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला तब्बल ३६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती; परंतु आता व्हेंटिलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होणार, अशी आशा रुग्णालय प्रशासनाला होती; परंतु व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी वेळेवर तंत्रज्ञ न मिळाल्याने महिनाभर व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले नव्हते. तर तंत्रज्ञ मिळाल्यानंतर व्हेंटिलेटरचा व्हॉल्व्ह जुळत नसल्याने व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.