अखेर नियतीपुढे हात टेकले...प्रांजलची कोरोनाविरुद्ध झुंज अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:23+5:302021-05-16T04:17:23+5:30
पातूर : तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाची गत आठवडाभरापासून सुरू ...
पातूर : तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाची गत आठवडाभरापासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री ११. १५ मिनिटांनी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. अखेर नियतीनेही साथ दिली नाही व प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
पातूर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजलने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम घेऊन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार तर प्रांजलला कोरोनाने गाठले. सुरुवातीला प्रांजलला अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रांजलची तब्येत गंभीर झाल्यामुळे जगण्याची आशा धूसर होत असताना कृष्णा अंधारे तथा आप्तस्वकीयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून डॉ. सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलचा शोध घेतला आणि संपर्क साधला. तलाठी म्हणून नोकरी करणाऱ्या प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांच्या जिल्हाधिकारी होणाऱ्या एकुलत्या एक प्रांजलच्या उपचारासाठी २७ लाख रुपये जमा करण्याचे आवाहन होते. अशा परिस्थितीत नातेवाइकांनी साथ दिली. हैदराबाद येथील डॉक्टरांचा चमू सोमवारी मध्यरात्री अकोल्यात पोहोचला. त्यांनी तेवढ्या रात्री प्रांजलवर उपचार सुरू केले. प्रांजलला धोक्याबाहेर काढण्यात आणि तब्येत स्थिर करण्यात यश आले होते. त्यानंतर प्रांजलला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्याचे डॉक्टरांनी सुचविले. यावेळी हेमलता अंधारे आणि कृष्णा अंधारे यांनी परिवाराला बळ दिले. सोमवारी पूर्वतयारी करून हैदराबाद येथील पाच डॉक्टरांसह ॲम्ब्युलन्सद्वारे अवघ्या एका तासामध्ये हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉ. जिंदाल आणि चमूने प्रांजलवर उपचार केले. बेशुद्ध असलेल्या प्रांजलने बुधवारी डोळे उघडले होते. बाबा आणि दोन्ही काकांसोबत प्रांजलने संवाद साधला होता. त्याच्या काकांनी लवकरच बरं होऊन घरी जाऊ, असे सांगितले. त्याची तब्येतही धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते; परंतु शुक्रवारी दुपारनंतर गुंतागुंत वाढली अन् प्रांजलची झुंज ही अपयशी ठरली.
---------------------------------
अकोला येथे झाले अंत्यसंस्कार
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या एअर ॲम्ब्युलन्सद्वारे शनिवारी प्रांजलचे पार्थिव अकोल्यात आणण्यात आले. अकोला येथील मोहता मिलच्या स्मशानभूमीत त्याच्यावर मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
प्रांजलने कठोर परिश्रम घेत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार होते. मात्र, त्याला कोरोनाने गाठले. सामान्य कुटुंबातील आई-वडिलांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांच्या मदतीने ५५ लाख रुपये जोडून उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हैदराबादच्या यशोदा हाॅस्पिटलला हलवले होते. मात्र, शुक्रवारी प्रांजलचा मृत्यू झाला. अखेर त्याचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.