अखेर सावरगाव, झरंडी, वसाली येथे आरोग्य पथक दखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:22+5:302021-08-18T04:25:22+5:30
खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल फिव्हर’ची साथ सुरू ...
खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल फिव्हर’ची साथ सुरू असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णाची तपासणी किंवा कुठल्याही प्रकारचे उपचार केले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १३ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, सावरगाव येथे आरोग्य पथक दाखल झाले, तसेच दुसऱ्या दिवशी शेजारी असलेल्या झरंडी, वसाली, अशा तिन्ही गावांत घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सावरगाव येथे उपकेंद्र असून, त्या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून सावरगाव येथे ‘व्हायरल फिव्हर'ची साथ सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला असताना, आरोग्य विभागाच्या हलगर्जी व शून्य कारभारामुळे शेकडो रुग्ण आजारी पडले आहेत. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याबाबतचा प्रकार दिसून येत आहे. गावातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात रुग्ण उपचारासाठी जातात, परंतु त्या ठिकाणी रुग्णांना दोन ते तीन गोळ्या दिल्या जातात. यासंदर्भात दि. १३ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.