अखेर कृषी विभागाकडून उडदाच्या पिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:21+5:302021-09-07T04:23:21+5:30
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील अंबाशी शिवारात दरवर्षीच उडदाचा पेरा कमी असतो. यंदाही मोजक्याच शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे. ...
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील अंबाशी शिवारात दरवर्षीच उडदाचा पेरा कमी असतो. यंदाही मोजक्याच शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत शेतात पीक बहरलेले आहे, परंतु उडदाला शेंगाच लागल्या नसल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाने दखल घेत कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन उडीद पिकाची पाहणी केली. यावेळी कृषी अधिकारी डी. एस. शेटे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी संजय अटक, पर्यवेक्षक डिगे यांनी शेतकरी संजय सोनोने यांच्या शेतात पाहणी केली. तीन-चार दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने सध्या फुले लागली आहेत. सदोष बियाणे नाही, तर वातावरणातील बदलामुळे फुले गळाल्याने शेंगा लागल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडून संजय सोनोने यांच्या शेतात पंचनामा करीत असताना विमा कंपनीकडे तक्रार दाखल करा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
---------------
नुकसानभरपाई देण्याची मागणी
अंबाशी शिवारातील जवळपास ५० एकर क्षेत्रावर पिकांना शेंगाच लागल्या नसल्याचे चित्र आहे. या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.