अखेर मार्च महिन्याचे रखडलेले वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:26+5:302021-05-11T04:19:26+5:30
मुर्तीजापूर : अकोला जिल्हा परिषद शिक्षकांच्या मार्च २०२१च्या वेतनाचे अनुदान संबंधित पंचायत समितीला दिनांक ५ मे रोजीच ...
मुर्तीजापूर : अकोला जिल्हा परिषद शिक्षकांच्या मार्च २०२१च्या वेतनाचे अनुदान संबंधित पंचायत समितीला दिनांक ५ मे रोजीच प्राप्त झाले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पगार होणे अपेक्षित होते. परंतु, मुर्तिजापूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे व लेखा विभागाच्या आडमुठेपणामुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळू शकले नाहीत. याबाबत ॲक्शन फोर्स संघटनेचे अध्यक्ष दीपकराज डोंगरे यांनी शासनाकडे तक्रार दाखल करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
शिक्षण विभाग आणि लेखा विभागामध्ये असलेला परस्पर समन्वयाचा अभाव आणि अधिकाऱ्यांची उदासिनता शिक्षकांचे पगार उशिराने होण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप ॲक्शन फोर्स संघटनेने आपल्या तक्रारीत केला होता. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची दखल घेऊन १० तारखेपर्यंत पगार अदा करण्याचे आदेश दिले. १० तारखेला शिक्षण विभाग आणि लेखा विभागाने तातडीने पगार अदा करण्याबाबतची कार्यवाही करुन दुपारी १२ वाजेपर्यंत मूर्तिजापूर पंचायत समितीमधील शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले.