अखेर नोटिफि केशन निघणार!
By admin | Published: June 17, 2017 01:32 AM2017-06-17T01:32:37+5:302017-06-17T01:44:17+5:30
पंदेकृवि कुलगुरू पद : अनेक शास्त्रज्ञ स्पर्धेत!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ आॅगस्टमध्ये संपणार आहे. या पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून, राज्यपाल यांनी या निवड प्रक्रियेसाठी समितीचे गठन केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना (नोटिफिकेशन) अखेर येत्या दोन ते तीन दिवसांत निघणार असल्याचे वृत्त आहे. याकडे सर्व ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे.
कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी अधिसूचनेत काय असेल, यावर सर्व ठरलेले असते. त्यानंतर या पदासाठी कोणाला संधी मिळणार, हे निश्चित होते. या अधिसूचनेत संचालक हा निकष लावल्यात आला, तर राज्यात सध्या एकच संचालक आहे. विभाग प्रमुखांचा निकष लावला तर सात-आठ विभाग प्रमुख आहेत. यामुळे अधिसूचनेची सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञांना प्रतीक्षा आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील वरिष्ठांसह भारतीय कृषी संशोधन परिषद, या परिषदेशी निगडित संस्था, देशातील कृषी संस्था आदींचे वरिष्ठ शास्त्रज्ञही कुलगुरू पदासाठी इच्छुक असतात. या सर्व प्रक्रियेत व्यक्तिगत माहिती (बायोडाटा) कशी आहे, संशोधन, संशोधन पेपर्स, अनुभव व कोणत्या पदावर कसे काम केले, आदींची सूक्ष्म महिती बघितली जाते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आजी-माजी वरिष्ठांसह राज्यातील इतर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही या स्पर्धेत असल्याचे वृत्त आहे. त्यासाठीच अधिसूचनेकडे या सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे. नोटिफिकेशन निघताच या प्रक्रियेला सुरुवात होईल.