...अखेर पातूर तालुका झाला कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 10:43 AM2020-10-28T10:43:44+5:302020-10-28T10:44:07+5:30
CoronaVirus, Patur Taluka सर्वात प्रथम कोरोनाचा शिरकाव झालेला पातूर तालुका पूर्णतः कोरोना मुक्त झाला आहे.
- संतोषकुमार गवई
पातूर: अकोला जिल्ह्यात सर्वात प्रथम कोरोनाचा िशरकाव झालेला पातूर तालुका पूर्णतः कोरोना मुक्त झाला आहे. धोका अजूनही टळला नसला तरी नागरीकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
८ एप्रिलपासून आजतागायत पातुर तालुक्यातील सत्तावीस गावांमध्ये ३८३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला. मात्र ३७४ नागरिक कोरोना सारख्या गंभीर जीवघेण्या आजारातून पूर्णतः बरे झाले आहेत. तसा अहवाल २६ ऑक्टोबर रोजी आराेग्य विभागाला प्राप्त झाला आहे.
३८३ कोरोना बाधितांपैकी पातुर शहरातील ४९ ग्रामीण भागातील ३२४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. पातूर तालुका अतिशय दुर्गम आणि मागास असल्यामुळे येथील नागरिक रोजगाराच्या शोधात देशात आणि राज्यात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कामाला गेलेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वजण गावाकडे परतले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झाला. तो थांबवण्यासाठी तालुकास्तरीय ग्रामस्तरीय तथा शहरातील शासकीय यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न केले आणि कोरोनाची वाढती गती मंदावली. मंद झालेली गती थांबवण्यात शासकीय यंत्रणांना नागरिकांच्या सहकार्याने यश मिळाले. आरोग्य यंत्रणेने गावागावात जाऊन रॅपिड टेस्ट आणि व्हिटिएम टेस्ट शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले.
प्रामुख्याने शिर्ला ,खामखेड ,माळराजुरा ,पिंपळखुटा ,मळसुर ,भानोस आलेगाव ,सस्ती ,बाभुळगाव शेकापूर ,गावंडगाव ,चतारी तुलंगा बुद्रुक ,बेलुरा खुर्द ,शिरपूर ,दिग्रस खुर्द, भंडारज बुद्रुक ,चान्नी, तांदळी बुद्रुक खुर्द, चांगेफळ ,विवरा, दिग्रस, आणि उमरा या गावांमध्ये शासनाच्या मदतीने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने मोहीम राबविल्या त्यामुळे कोरोणाला पातुर तालुक्यातून सध्यातरी हद्दपार करण्यात यश मिळाले आहे.
पातुर तालुक्यात ९५ गावे आहेत. २७ गावे वगळता उर्वरित गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरच थांबवलं.
यामध्ये पातुर आणि चान्नी पोलीस स्टेशन, तालुका महसूल प्रशासन, गावागावातील ग्रामपंचायत प्रशासन तथा जागरूक नागरिक तथा आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, डॉ. चिराग रेवाळे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. योगेश नानोटे, नितीन जाधव, राजेश शिंदे, रामकृष्ण खुळे, विनोद कांबळे, प्रदीप मोहोकार यांच्यासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आशा स्वयंसेविका ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार आदींनी मोलाची भूमिका पार पाडली आहे.