अखेर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणार मानधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:05 PM2019-08-02T14:05:53+5:302019-08-02T14:06:13+5:30
शिक्षण संचालनालयाने ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, सीएचबी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
अकोला : शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये नियुक्त केलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, १५ आॅगस्टपर्यंत त्यांना मानधन मिळण्याची शक्यता आहे. ‘तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मानधनापासून वंचित’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २६ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण संचालनालयाने ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, सीएचबी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करून दर महिन्याला शालार्थ वेतन प्रणालीने मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; मात्र या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने नवीन सत्र सुरू होऊनही मानधन मिळाले नाही. वर्षभर सेवा देऊनही मानधन न मिळाल्याने सीएचबी प्राध्यापकांवर उमासमारीची वेळ आली आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा हा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर शासनाने या वृत्ताची दखल घेतली. यासंदर्भात अमरावती विभाग उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत ३१ जुलै रोजी विभागातील सर्वच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागणी केलेल्या रकमेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत प्रत्यक्ष घेतलेल्या तासिकांनुसार मागणीचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. त्यानुसार विभागातील जवळपास १५२ महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले होते. महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांची मागणी संचालनालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, संचालनालयाने ही रक्कम मंजूर केली आहे.
महाविद्यालयांचा खोडा
उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत मागविण्यात आलेली संपूर्ण माहिती जोपर्यंत महाविद्यालय पाठविणार नाही, तोपर्यंत पडताळणी पूर्ण होणे शक्य नाही. महाविद्यालयांना ५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, बहुतांश महाविद्यालये पूर्ण माहिती पाठवित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच मानधन
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या एकूण मानधनाची रक्कम ही त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच मिळणार आहे. त्यानुषंगाने महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठवावी लागणार आहेत.
या दस्तऐवजांची होईल पडताळणी!
- सीएचबी प्राध्यापक नियुक्तीचा समिती अहवाल
- संबंधित प्राध्यापक रुजू अहवालाची प्रत
- विद्यापीठाचे मान्यता पत्र
- प्राध्यापकाने तासिका घेतलेला कालावधी
- वेळापत्रक ४विद्यार्थी हजेरी
- घेतलेल्या एकूण तासिकांची संख्या
- घेतलेल्या एकूण प्रात्यक्षिकांची संख्या
- एकूण मागणीची प्रतिप्राध्यापकनिहाय रक्कम.
संचालनालयामार्फत ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माहविद्यालयांनी ५ आॅगस्टपर्यंत मागितलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
- डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती विभाग, अमरावती