अखेर आंतरवासीता डॉक्टरांची कोविड वॉर्डात सेवा सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:34 AM2020-10-06T10:34:47+5:302020-10-06T10:34:55+5:30
Akola GMC Intern Doctor सोमवारपासून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने कोविड भत्ता लवकरच सुरू करू, असे आश्वासन दिल्याने येथील आंतरवासीता डॉक्टरांनी सोमवारपासून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. कोविड भत्त्याच्या मागणीसाठी गत चार दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील १२० आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डातील रुग्णसेवा बंद केली होती.
राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासीता डॉक्टरांना सुरुवातीपासून कोविड भत्ता लागू करण्यात आला होता; मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासीता डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही. विद्यावेतनही नियमित मिळत नसल्याने आंतरवासीता डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना रुग्णालय प्रशासनाने आंतरवासीता डॉक्टरांना कोविड भत्ता लागू करावा, यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने सर्वोपचार रुग्णालयातील १२० आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गत चार दिवसांपासून कोरोना वॉर्डातील बहुतांश भार परिचारिकांवर आला होता. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आंतरवासीता डॉक्टरांना नोटीस बजावत २४ तासात रुजू व्हा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यासोबतच रुग्णालय प्रशासनातर्फे आंतरवासीता डॉक्टरांना १५ दिवसांत कोविड भत्ता लागू करण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे सोमवारपासून आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात सेवा देण्यास सुरुवात केली; मात्र आश्वासनानुसार, कोविड भत्ता न दिल्यास आंतरवासीता डॉक्टरांकडून कोविड वॉर्डातील रुग्णसेवेला पुन्हा नकार दिला जाऊ शकतो.