अखेर सबर्मसिबल पंप दुरुस्तीचा आदेश काढला!
By admin | Published: March 17, 2015 01:06 AM2015-03-17T01:06:43+5:302015-03-17T01:06:43+5:30
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सबर्मसिबल पंप व हातपंप दुरुस्तीचे आदेश जारी.
अकोला: शहरातील नादुरुस्त सबर्मसिबल पंपामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच मनपाची प्रशासकीय यंत्रणा झोपेतून जागी झाली. उशिरा का होईना, उन्हाळ्य़ातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सबर्मसिबल पंप व हातपंप दुरुस्तीचे आदेश जारी केले. मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. शहराच्या अनेक भागात जलवाहिनीद्वारे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने सबर्मसिबल पंप व हातपंपाची सुविधा उपलब्ध करून दिली. या सबर्मसिबल व हातपंप देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मनपाची असून, उन्हाळ्य़ातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, त्यापूर्वीच सबर्मसिबल व हातपंपाची दुरुस्ती केली जात होती; परंतु मनपाचा आस्थापना खर्च ६४ टक्केपेक्षा जास्त असल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काटकसर करण्याची सबब पुढे करीत सबर्मसिबल व हातपंप देखभाल दुरुस्तीची कामे बंद केली. सदर सबर्मसिबल पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे पत्र उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी महावितरण कंपनीला दिले होते. परिणामी विविध भागातील सबर्मसिबल पंप मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांच्या समस्येचा लोकमतने ऊहापोह करताच आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवारी जलप्रदाय विभागाची बैठक तातडीने आयोजित केली. नादुरुस्त सबर्मसिबल व हातपंप दुरुस्तीचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. बैठकीला शहर अभियंता अजय गुजर, जलप्रदाय विभागाचे उपअभियंता नंदलाल मेश्राम व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते
. *मनपा निधीतून कामे
नादुरुस्त सबर्मसिबल व हातपंपाची दुरुस्ती करण्यासाठी मनपा निधीतून कामे प्रस्तावित केली जातील. आजरोजी शहरात सुमारे २ हजार ७00 हातपंप असून, ४00 च्या जवळपास सबर्मसिबल पंप आहेत. यामधील ९0 टक्के हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत.
*कंत्राटदारांना सुगीचे दिवस
जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यासह सबर्मसिबल व हातपंपाची दुरुस्ती करण्याचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत केले जाते. तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित कंत्राटदारांची देणी अदा न करण्याची भूमिका घेतल्याने गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत कंत्राटदारांनी तब्बल साडेतीन महिने साखळी उपोषण छेडले होते. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दुरुस्तीच्या कामाचे आदेश जारी केल्याने कंत्राटदारांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.