अखेर पालकांसह शिक्षकांनी लावले शाळेला कुलूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:36+5:302021-02-16T04:19:36+5:30
आडसूळ येथील जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे. या शाळेत १८० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा अकोट-शेगाव रोडवर असल्याने, गत काही ...
आडसूळ येथील जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे. या शाळेत १८० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा अकोट-शेगाव रोडवर असल्याने, गत काही दिवसांपासून गावातील नितीन अमझरे नामक युवकाने शाळेलगत अतिक्रमण थाटून रसवंती व हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यामुळे रोडवरून जाणारे वाहनचालक, प्रवासी येथे थांबतात. यासोबतच रसवंती मशीनचा आवाजामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. १० महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्यानंतर आता हॉटेल व रसवंती चालकाचा त्रास सहन करावा लागत आहे. रसवंती मशीनचा आवाज वर्गात घुमत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. शाळेलगतचे अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी ग्रामपंचायत, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. अतिक्रमण काढण्यात आले नाहीतर शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीने निवेदनातून दिला होता. परंतु ग्रामपंचायत प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासनासह गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ही तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद ठाकरे, सदस्य अरूण नवलकार, प्रभू महल्ले, शाळेचे मुख्याध्यापक अंबादास वानखडे यांनी मंगळवारी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले. अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतरच शाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडण्यात येईल. असे शाळा व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.
फोटो:
शाळेजवळील अतिक्रमण काढण्याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्राम सचिवांकडे तक्रार केली होती. परंतु अतिक्रमण काढण्यात आले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी शाळेला कुलूप लावण्यात आले. अतिक्रमण काढल्यानंतरच शाळा सुरू होईल.
-मुकुंद ठाकरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती