अखेर पिण्याच्या पाण्यासाठी रोहना येथील महिलांचे उमा नदीकाठी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:57+5:302021-09-23T04:21:57+5:30
गावातील पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रोहणावासी गावापासून दूर असलेल्या उमा नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणतात. पावसाळ्याच्या दिवसात नदीचे दूषित पाणी ...
गावातील पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रोहणावासी गावापासून दूर असलेल्या उमा नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणतात. पावसाळ्याच्या दिवसात नदीचे दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जोरदार पाऊस झाल्यास नदीला पूर असतो. पाणी आणताना एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्या, अशी मागणी करीत उपोषणाला बसण्याचा इशारा १ सप्टेंबर २०२१ रोजी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून दिला होता. परंतु, प्रश्न मार्गी न लागल्याने बुधवारी उमा नदीकाठावर भर उन्हात साखळी उपोषणाला ४० ते ४५ महिलांनी सुरुवात केली आहे.
-----------------
मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार!
जोपर्यंत मागण्या पूर्णत्वास जाणार नाही, तोपर्यंत लढा कायम ठेवू, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. उपोषणाला हम चालीस संघटना मूर्तिजापूरच्या वतीने पाठिंबा देऊन सध्याची परिस्थिती लक्षात घेता संघटनेच्या माध्यमातून उपोषणकर्त्या महिलांना मास्कचे वाटप केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, बंडूभाऊ डाखोरे, बाळू सरोदे, शहाबुद्दीन, सुनील वानखडे यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.
-----------------------------