वित्त आयोग: २५ टक्के निधी शाळांसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:52 PM2020-03-06T13:52:49+5:302020-03-06T13:52:55+5:30
अर्थसंकल्पात काही शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीसी कॅमेरे लावण्यात येतील. त्या शाळा मॉडेल करण्याचे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील १३ शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार केल्या जातील. वित्त आयोगाचा २५ टक्के निधी शाळांसाठी खर्च करणे, सोबतच दिल्लीच्या शाळांमध्ये केलेल्या बदलांची पाहणी करण्यासाठी समितीचा दौरा नियोजित करण्याचे शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ठरवण्यात आले. सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी जिल्ह्यातील ८४ केंद्रप्रमुखांची बैठक बुधवारी घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे ठरले. शाळांना आवश्यक सुविधांमध्ये नवीन खोली बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, डिजिटल साहित्याचा वापर, रॅम्प सुविधा, शालेय रंगरंगोटी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांशी संपर्क ठेवणे, ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
चौदाव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी त्यासाठी खर्च करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना पत्र देण्यात येईल. नियोजन समितीमधून दुरुस्ती व नवीन खोली बांधकामासाठी १८ कोटी रक्कम असून, ती शाळांवर खर्च केली जाईल, असे अश्वासन देण्यात आले. पुढील अर्थसंकल्पात काही शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीसी कॅमेरे लावण्यात येतील. त्या शाळा मॉडेल करण्याचे ठरले.
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार त्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार केल्या जात आहेत. शिकस्त शाळांची समस्या शिबिरात निकाली काढली जाईल. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची बदली न करता त्यांचा सत्कार केला जाईल. शाळांचे वीज देयक भरण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्याचेही ठरले. गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाºया शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. दिल्ली येथील सरकारी शाळांमध्ये झालेला बदल पाहण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या संयुक्त समितीचा शैक्षणिक दौरा नियोजित करण्याचेही ठरले. त्या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद अकोलामधील शाळांमध्ये बदल करण्याची तयारी असल्याचे सभेत सांगण्यात आले. सभेस प्रशासन अधिकारी सुनील जनोरकर, अंकुश पटेल, पंचायत विभागाचे संजय उंबरकर, प्रशांत अंभोरे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.