खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक बजेट कोलमडले
By admin | Published: June 1, 2017 01:36 AM2017-06-01T01:36:46+5:302017-06-01T01:36:46+5:30
बँकांनी हात आखडले; शेतकरी संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत असून, शेती मशागतीसह बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र बँकांनी हात आखडता घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
तेल्हारा तालुक्यातील जनतेचे आर्थिक व्यवहार करण्याचे मुख्य शहर म्हणजे तेल्हारा. तालुक्यातील दहीगाव, माळेगाव, हिवरखेड, भांबेरी, तळेगाव बाजार या मोठ्या गावांसह लहान ग्रामीण भागातून नागरिकांची दैनंदिन कामे करण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी धाव घेतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँक. कारण गेल्या सहा महिन्यांपासून जनतेने आपल्या भविष्यातील कामकाजाचा आधीच आढावा घेऊन गुंतवणूक करून ठेवलेले पैसे पूर्णपणे मिळत नसल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कारण ९/११ च्या नोटाबंदीनंतर प्रचंड प्रमाणात पैशांचा तुटवडा पडल्याने बँक आणि खातेदार यांच्यात तणाव निर्माण होत आहेत. लग्न, वस्तू खरेदी याकरिता लागणारा पैसा हा एकरकमी मिळत नसल्याने रोज थोडे थोडे पैसे काढून स्वत:च्या घरीच पैसे जमा करण्यावर नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. त्यामुळे जुन्या काळातील लोकांना घरी पैसा जमा करण्याची जुनी पद्धत पुढे येत असल्याची आठवण होत आहे. लवकरच मृग नक्षत्राचे आगमन होत असून, शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. कारण बागायती शेतकरी १ जूनपासूनच कपाशीची लागवण करीत असल्याने त्याकरिता लागणारे बियाणे विकत आणणे गरजेचे आहे. त्यातही नामांकित असलेल्या पऱ्हाटीच्या कंपनीचे बियाणे उधारीवर मिळत नसल्याने नगदी घ्यावे लागेल. ते प्रचंड महाग असल्याने व त्यातही बँकांमधून केवळ २ ते ४ हजार रुपये मिळत असल्याने त्याचा समन्वय साधणे कठीण जात आहे. ज्या बँकांमध्ये आपले पैसे आहेत, त्या घरातील एक व्यक्ती रोज तेल्हारा येथील बँकांमध्ये पैसे काढण्याकरिता येत आहेत.
त्यामुळे बँकांच्या व्यवहारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पेरणीचे दिवस अगदी जवळ आले असून, बियाणे, खत, पेरणी, मजुरांची मजुरी तसेच दैनंदिन गरजा भागविण्याकरिता स्वकष्टाच्या कमाईतून कमावलेला पैसा बँकेत न ठेवता व वेळेवर पूर्ण पैसे मिळत नसल्याने घरीच पैसे जमा करून ठेवण्यावर जनतेचा कल असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक अल्पबचत ठेवीच्या माध्यमातून रोज मिळणाऱ्या दीडशे रुपये मजुरीमधील ५० रुपये गुंतवणूक करणे गरजेचे होते; परंतु बँकेमधून पूर्ण पैसे मिळणार की नाही मिळणार, त्यापेक्षा घरीच पैसे जमा केलेले बरे.
- गजानन न. मोडोकार,
शेतमजूर, रायखेड.
पेरणीचे दिवस जवळ आले असून, कपाशीचे बियाणे, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन यांच्या खरेदीकरिता लागणारा पैसा कसा गोळा करायचा.
- उमेश व. धरमकर,
शेतकरी, दहीगाव अवताडे.