कोरोना रुग्ण वाढल्याने खासगी वाहतूकदारांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:43 AM2021-03-20T10:43:02+5:302021-03-20T10:43:15+5:30
Akola Travels Bus दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या ४० वरून एकाएकी १५ ते १७ वर आली आहे.
अकोला : शहरातून राज्यात व परराज्यात खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासी वाहतूक केली जाते. कोरोनामुळे या वाहतूकदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. येथून दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या ४० वरून एकाएकी १५ ते १७ वर आली आहे. तब्बल आठ ते नऊ महिन्यांच्या नुकसानीनंतर आता कुठे व्यवसाय रुळावर येऊ पाहात होता. मात्र, शहरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा संकट उभे ठाकले आहे.
अकोला शहरातून मुंबईसह सुरत, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नाशिक या लांब पल्ल्याच्या तसेच अमरावती, वर्धा, जळगाव, खान्देश या शहरांसाठी वातानुकूलित आणि साध्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणावर सुटतात. शहरातून दररोज सुमारे ३५ ते ४० ट्रॅव्हल्स सुटत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी हा व्यवसाय तेजीत होता. मात्र, लॉकडाऊनपासून या व्यवसायावर अवकळा आली आहे. यंदा पुन्हा १५ फेब्रुवारीपासून लॉकडाऊन लागू झाले. प्रवाशांची संख्या घटली. प्रशासनाने ५० टक्के प्रवासी घेऊन वाहने चालविण्याची परवानगी दिली. मात्र, खर्च परवडत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी फेऱ्या बंद व कमी केल्या. अनेकजण नाईलाजाने कमी प्रवासी घेऊन सेवा देत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स वाहतूकदार चिंतेत पडले आहेत.
गाडी रूळावर येत होती पण...
जवळपास नऊ महिने सर्व व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू पुन्हा व्यवसाय रूळावर येत होते. ट्रॅव्हल्स ५० टक्के क्षमतेने धावू लागल्या होत्या. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ट्रॅव्हल्स बंद ठेवाव्या लागत आहेत.
प्रवासी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक ट्रॅव्हल्स उभ्या आहेत. त्यात सॅनिटायझेशनचा खर्च वाढला आहे.
विनोद जकाते, ट्रॅव्हल्स मालक
ऐन लग्नसराई व होळीसारख्या सणाच्या काळात कोरोना वाढल्याने व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवाशांची संख्याही रोडावली आहे. डिझेलचा खर्च काढणे कठीण झाले आहे.
प्रकाश डुकरे, ट्रॅव्हल्स मालक
प्रवासी येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स कसा भरायचा, असा प्रश्न समोर आहे. नाईलाजास्तव गाडी बंद ठेवावी लागत आहे.
महेश बोकाडे, ट्रॅव्हल्स मालक
रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या
४०
सध्याची संख्या
१५ ते १७