विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आर्थिक अपहार; शिवसेना आमदारांच्या खात्याचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:58 PM2020-05-31T16:58:21+5:302020-05-31T16:58:30+5:30
पीक कर्जाची उचल करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी उजेडात आणला आहे.
अकोला: पीक कर्जाच्या रकमेची उचल न केलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने पीक कर्जाची उचल करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी उजेडात आणला आहे. पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी शिवसेनेच्या आमदारांसह या भागातील अनेक शेतकºयांच्या नावाने शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आ. नितीन देशमुख यांनी केला.
पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी या परिसरातील शेतकºयांच्या नावाने पीक कर्जाची उचल करणे, थकीत रकमेचा भरणा न करता संबंधित शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये समाविष्ट करणे आणि त्यानंतर शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीची रक्कम पुन्हा परस्पर हडप करणे अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांचा खुद्द या बँकेचे खातेदार शिवसेना आ. नितीन देशमुख यांनी भंडाफोड केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील तत्कालीन अधिकाºयांनी शेतकºयांच्या नावाचा तसेच बँक खात्यांचा दुरुपयोग करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी कसा चुना लावला. याचा पाढाच आयोजित पत्रकार परिषदेत आ. देशमुख यांनी वाचला. आ. देशमुख यांनी १३ मे २०१३ रोजी या बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड २० मार्च २०१७ रोजी करण्यात आली. त्यानंतर बँकेने कर्जाची परतफेड केल्यानंतर कर्ज खाते बंद करणे क्रमप्राप्त होते. तसे न करता कालांतराने आमदार देशमुख यांच्या खात्यातून ७७ हजार ४०७ रुपयांच्या कर्जाची परस्पर पुन्हा उचल करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच आ. देशमुख यांनी यासंदर्भात बँकेकडे २८ एप्रिल २०२० रोजी तक्रार केली असता आ. देशमुख यांच्या बँक खात्याचा दुरुपयोग करीत तत्कालीन बँक अधिकाºयांनी ७७ हजार ४०७ रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार विद्यमान बँक अधिकाºयांच्या निदर्शनास आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती आ. नितीन देशमुख यांनी दिली. यावेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गोपाल दातकर, अकोला तालुका प्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, उमेश जाधव, बबलू देशमुख व युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे उपस्थित होते.
शेतकरी अस्तित्वात नाही; तरीही पीक कर्जाचे पुनर्गठन
बँकेतील तत्कालीन अधिकाºयांनी प्रकाश ओंकार जावळे रा. उमरा पांगरा या शेतकºयांच्या नावाने ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतले. पीक कर्जाचे खाते पात्र नसताना चुकीचे पुनर्गठन केले. तसेच उचल केलेली रक्कम दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती केली. चौकशीअंती प्रकाश ओंकार जावळे नामक शेतकरीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या भागातील मोतीराम संपत मावळकर यांच्या मृत्यूनंतर बँकेने त्यांना मिळालेली पीक विम्याची ३६ हजार रुपयांची रक्कम परस्पर अदा केली. हा व्यवहार बँकेतील दस्तऐवजामध्ये कोठेही आढळून आला नाही.