‘पीडब्ल्यूडी’मध्ये आर्थिक अनियमितता; चाैकशीसाठी शासनाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:30+5:302021-01-19T04:21:30+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील रस्ते विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त हाेताे; परंतु प्राप्त निधीतून रस्त्यांचे दर्जेदार ...
सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील रस्ते विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त हाेताे; परंतु प्राप्त निधीतून रस्त्यांचे दर्जेदार निर्माण हाेणे अपेक्षित असताना रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार राहत असल्याचे दिसून येते. २०१७-१८ या कालावधीत नगर विकास विभागाकडून ‘पीडब्ल्यूडी’ला प्राप्त विशेष निधीचा वापर करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार कपिलकुमार पारवानी यांनी नगर विकास विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली हाेती. संबंधित अभियंत्यांनी बाेगस देयके लाटल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह तत्कालीन उपअभियंता व विद्यमान शाखा अभियंत्याचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेत ‘पीडब्ल्यूडी’ विभागाने मुख्य अभियंता पी.डी. नवघरे यांना चाैकशी करण्याचा आदेश जारी केला आहे.
...तर शिस्तभंगाचा प्रस्ताव सादर करा!
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन व विद्यमान अभियंत्यांच्या कालावधीतील कामकाजाची इत्थंभूत चाैकशी करून दाेषी आढळून येणाऱ्यांविराेधात कारवाई करा. कारवाईसाठी सक्षम नसाल तर संबंधितांविराेधात जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाचा प्रस्ताव सादर करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
लाेकप्रतिनीधींच्या सूचनेवरून कामे
नगर विकास विभागामार्फत प्राप्त विशेष निधीतून लाेकप्रतिनीधींनी कामे सुचविल्याची माहिती आहे. यातील बहुतांश कामे मर्जीतील व भरघाेस टक्केवारी अदा करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यासाठी तत्कालीन अभियंत्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे याप्रकरणाची निष्पक्ष चाैकशी झाल्यास अनेकांच्या प्रामाणिकतेचा बुरखा फाटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.