राज्यात १०० दिवसात एसटीला २ हजार कोटींचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:59 PM2020-07-18T12:59:08+5:302020-07-18T12:59:18+5:30
- सचिन राऊत अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल ...
- सचिन राऊत
अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच कारणामुळे राज्य परिवहन महामंडळात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचेही मोठे वांधे झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या दररोजच्या हजारो फेºयांच्या माध्यमातून राज्यातील सर्व बस डेपोचे तब्बल २१ कोटी रुपयांचे सर्वसाधारण उत्पन्न होते; मात्र २० मार्चनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोरोनाच्या भीतीमुळे बंद करण्यात आल्याने एसटीची चाके १०० दिवसांपासून थांबलेली आहेत. त्यामुळे हजारो अधिकारी व कर्मचारी घरीच बसून असल्याने महामंडळाला दिवसाला तब्बल २१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यानुसार गत १०० दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाला तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन देण्यासही एसटीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; मात्र तरीही एसटी महामंडळाच्या मंत्र्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी खचून न जाता कोरोनाला लढा देत मालवाहतुकीच्या क्षेत्रात पाउल टाकले. या माध्यमातून त्यांनी उत्पन्न गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहेस मात्र मालवाहतुकीतून येणारे उत्पन्न हे खारीचा वाटा उचलणारे असल्याने सध्या तरी एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाºयांना याच अडचणींचा आणखी काही दिवसा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे. गत १०० दिवसांच्या कालावधीत एसटीने २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन केले आहे; मात्र आता काही जिल्ह्यात एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
विनाकारणच्या खर्चाला कात्री
राज्य परिवहन महामंडळाने विनाकारण होणाºया खर्चाला आता कात्री लावणे सुरू केले आहे. त्यामुळे अधिकाºयांच्या रजा व भत्ते बंद केल्यानंतर आता विविध सुविधाही कमी करण्यात येत आहे. एसी तसेच इतर हायफाय खर्च कमी करून एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी अधिकाºयांनीही खांद्याला खांदा लावून साथ देण्याचे आवाहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.
रुग्णवाहिका, मालवाहतुकीचा आधार
राज्य परिवहन महामंडळाचे खर्च भागविण्याचेही वांधे सध्या सुरू आहेत; मात्र राज्यातील सर्वात प्रथम अकोला जिल्ह्यातून एसटीने मालवाहतुकीस प्रारंभ करून उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच माध्यमातून आतापर्यंत १ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न एसटी महामंडळाला प्राप्त झालेले आहे; मात्र हे उत्पन्न प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत अत्यल्प असल्याने एसटीची चाके पुन्हा रस्त्यावर येण्याचीच प्रतीक्षा आहे. त्यानंतरच एसटीची आर्थिक घडी सुरळीत चालणार असल्याची माहिती आहे.