केरोसीन मिळेना; गॅस ग्राहक पेचात
By admin | Published: October 12, 2015 01:55 AM2015-10-12T01:55:50+5:302015-10-12T01:55:50+5:30
अकोला जिल्ह्यातील लाखावर गॅस सिलिंडरधारकांचे वितरण बंद.
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यात एक व दोन गॅस सिलिंडधारक १ लाख ३ हजार ५८६ ग्राहकांना केरोसीनचे वितरण बंद करण्यात आले आहे. रास्तभाव दुकानांमधून मिळणारे केरोसीन मिळत नसल्याने, आता केरोसीन आणणार कोठून, असा पेच जिल्ह्यातील गॅस सिलिंडर ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एक गॅस सिलिंडरधारक ग्राहकांना दरमहा चार लीटर आणि दोन सिलिंडरधारक ग्राहकांना दोन लीटर केरोसीनचे वितरण रास्तभाव दुकानांमधून करण्यात येत होते. परंतु, राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील एक आणि दोन गॅस सिलिंडरधारक ग्राहकांना दरमहा वितरित करण्यात येणारे केरोसीनचे वितरण बंद करण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत २0 ऑगस्ट २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार सप्टेंबरपासून जिल्ह्यातील १ लाख ३ हजार ५८६ गॅस सिलिंडरधारक ग्राहकांना केरोसीनचे वितरण बंद करण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दरमहा मिळणारे केरोसीन मिळत नसल्याने, गॅस सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयं पाक, दिवाबत्ती व इतर कामांसाठी उपयोगात येणारे केरोसीन आता कोठून आणणार, असा प्रश्न जिल्ह्यातील गॅस सिलिंडरधारक ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.