जलकुंभीवर तोडगाच सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:56 PM2017-10-11T13:56:29+5:302017-10-11T13:56:42+5:30
अकोला: मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्यापही यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. ही बाब ध्यानात घेता पर्याय म्हणून नदी पात्राची बाराही महिने साफसफाई केल्यास जलकुंभीचा नायनाट होण्यासोबतच परिसरातील साफसफाईवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचा प्रस्ताव भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. हा प्रस्ताव मागील दोन महिन्यांपासून धूळ खात पडून आहे, हे येथे उल्लेखनीय.
मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीमुळे केवळ नदीकाठच्या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून चक्क मोर्णा नदीचा वापर केला जातो. सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच घाण पाणी नदी पात्रात सोडल्या जात असल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामध्ये घातक रसायनांचा समावेश असल्याने नदीकाठसह इतर भागातील जलस्रोत दूषित झाले आहेत. जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची पैदास वाढली असून, दुर्गंधीमुळे नदीकाठचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. जलकुंभीवर तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा केली होती. पुढे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ऐन पावसाळ््याच्या तोंडावर जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रकाशित होत असे. संबंधित कंत्राटदार मजुरांच्या माध्यमातून जलकुंभी काढल्यानंतर नदी काठावर फेकून देत होते. या कामासाठी कंत्राटदाराला आठ ते दहा लाख रुपयांचे देयक अदा केले जात असले तरी चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर नदी पात्रात पुन्हा जलकुंभीची समस्या ‘जैसे थे’ होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वर्षभरातून एकदा जलकुंभी न काढता मोर्णा नदी पात्राची बाराही महिने साफसफाई करण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. या प्रस्तावावर अद्यापपर्यंतही निर्णय न घेतल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.
विरोधी पक्ष आहे कुठे?
जलकुंभीच्या समस्येमुळे संपूर्ण अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन ठोस निर्णय घेत नसून, सत्ताधाºयांचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षाने समोर येणे अपेक्षित असताना महापालिकेत विरोधी पक्षालाच शोधण्याची वेळ आली आहे. मनपात विरोधी पक्षनेता साजिद खान सोयीचे राजकारण करीत असल्याची खमंग चर्चा शहरात होत आहे.