तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:11+5:302021-08-23T04:22:11+5:30
अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई ...
अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ गत दाेन वर्षांत तब्बल दीड काेटीच्या सुमारास दंड ई चालानचा थकीत असून हजाराे वाहनांवर दंड थकीत असल्याने अशा वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून नाेटीस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे. वाहतूक शाखेचे कामकाज आता अद्ययावत हाेत असून गतीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीड गन कारद्वारे कारवाई करण्यात येते, तर मद्यपींची आराेग्य तपासणी करून दंडात्मक तसेच फाैजदारी कारवाई करण्यात येत आहे़ आतई चालान पध्दतीद्वारे राज्यात कुठेही दंड भरण्याची सुविधा असल्याने तसेच दंडाची रक्कम वाहनावर थकीत राहत असल्याने हजाराे वाहनचालक दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे हजाराे वाहनांवर काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे़ जिल्ह्यात ही रक्कम दीड काेटीच्या घरात दंड थकीत असून वसुलीसाठी पाेलिसांनी आता नाेटीस बजावली आहे.
वर्ष कारवाया वसूल दंड
२०१९ ५९५५६ १२२५८९००
२०२० ७४१२८ ७१९४६००
२०२१ ६०००० ५० लाखांच्या सुमारास
कसे फाडले जाते ई चालान
एखाद्या वाहनाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक ई चालान पद्धतीत घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते़ यावेळी वाहनचालकाचा परवाना घेऊन ताे मशीनमध्ये तपासल्या जातो. वाहनावर किंवा वाहनचालकाच्या परवान्यावर दंडात्मक रक्कम आपाेआप समाेर येते़ आधी दंड असेल तर नवीन दंड करण्यास अडचणी येतात़ त्यामुळे अशावेळी वाहनचालकाला आधीचा दंड भरणे बंधनकारक आहे़ मात्र, असे असले तरीही काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत असल्याचे वास्तव आहे़
माेबाइल अपटेड केला आहे का
वाहनचालकाचा माेबाइल क्रमांक आता संलग्नित करण्यात येतो. त्यामुळे माेबाइल क्रमांक व आरसी क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे़ तुमच्या माेबाइल क्रमांकावरच दंडाची पावती ऑनलाइन पाठविल्या जाते़ त्यामुळे तुमचे बँक खाते व इतर शासकीय कामासाठी दिलेला माेबाइल क्रमांक वाहन घेतानाही अपडेट करणे गरजेचे आहे़
दंडाची थकबाकी वाढली
ई चालान पद्धतीमध्ये दंड उधारीवर ठेवण्याची मुभा आहे़ त्यामुळे प्रत्येक वाहनचालक पैसे नसल्याचे कारण देऊन त्या ठिकाणावरून निघून जाताे. त्यानंतर पुन्हा ते वाहन पकडेपर्यंत त्याला दंड भरावा लागताे, ही माहिती नसते़ त्यामुळे असा सुमारे दीड काेटी रुपयांचा दंड जिल्ह्यात थकीत असून पाेलिसांनी अशा वाहनचालकांना नाेटीस बजावत दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना केली आहे.
थकीत असलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी नाेटीस पाठविण्यात आलेली आहे. तसेच ही वसुली माेहीम आता वेगात सुरू करण्यात येणार आहे़ ज्या वाहनचालकांकडे रक्कम थकीत आहे, त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचीही तरतूद आहे़ त्यामुळे अशा प्रकारे कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे़
विलास पाटील
वाहतूक शाखा प्रमुख, अकाेला