वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:45 PM2018-10-16T12:45:08+5:302018-10-16T12:45:26+5:30
अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सदर युवकाचा वाहन परवानाही रद्द करण्यात आला आहे.
वाशिम बायपासवरील साई मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चोहोट्टा बाजार येथील रहिवासी शेख अनिस शेख अकील (२६) याने जड वाहन शिकण्यासाठी व वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रवेश घेतला होता. यासाठी ड्रायव्हिंग स्कूलतर्फे त्याच्या वाहन परवान्यासाठी १३ आॅगस्ट २०१८ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यात आली. या कागदपत्रांमध्ये त्याने संत गाडगेबाबा विद्यालय, येसुर्णा, अचलपूरच्या शाळेची शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे जोडली होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत शेख अनिस याला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना दिला होता. कागदपत्रे तपासणीत संत गाडगेबाबा विद्यालय हे इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतच असल्याचे समोर आले. सोबतच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेला क्रमांक शाळेच्या रेकॉर्डवर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. टीसीत उल्लेख केला आहे की शाळेत इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतला; मात्र तपासणीनंतर बनावट कागदपत्र असल्याचे लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन विभागाने शेख अनिस शेख शकील याचा परवाना रद्द करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी मोटर वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.