मळसूर येथे अग्नितांडव; पाच घरांसह दोन गोठे पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 06:42 PM2022-05-17T18:42:04+5:302022-05-17T18:42:19+5:30
Fire at Malsur; पातूर तालुक्यातील मळसूर येथे भर दुपारच्या सुमारास आग लागली.
मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे दि. १७ मे रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच घरांसह दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या आगीत पाचपैकी तीन घरे खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
सध्या उन्हाचा पारा ४५ पार झाला असून, वाढलेल्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच पातूर तालुक्यातील मळसूर येथे भर दुपारच्या सुमारास आग लागली. आगीने पेट धरत पाच घरांना कवाट्यात घेत रौद्ररूप धारण केले होते. या आगीत संदीप नारायण तायडे, किशोर नारायण तायडे, नंदा नारायण तायडे यांचे घर जळून खाक झाले तर, त्यांच्या शेजारी असलेल्या पुरुषोत्तम तायडे, रमेश तुकाराम राखोंडे यांच्या गोठ्यातील शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. तसेच आगीच्या लोटाने पुन्हा पेट धरत शेजारीच असलेले गोविंदा सुखदेव राखोंडे, सखाराम सुखदेव राखोंडे यांच्या घराचेही नुकसान झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी समयसूचकता बाळगत गोठ्यातील गुरे, घरातील नागरिक व मूल्यवान वस्तू, टॅक्टर बाहेर काढले होते. दरम्यान, या आगीत अन्नध्यान्य, कपडे, साहित्यांसह लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी ढोरे तलाठी इचे व नळकांडे गावचे सरपंच पोलीस पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याची प्रत पातूर तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात असून, नुकसानग्रस्त नागरिकांना मदत देण्याची मागणी होत आहे.