मूर्तिजापूर एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:05 AM2019-07-26T11:05:05+5:302019-07-26T11:05:15+5:30
मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली.
मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मूर्तिजापूर बायपास कंझरा रोडवर असलेल्या एमआयडीसी परिसरातील तनिष्क केमिकल फॅक्टरी ला अचानक आग लागली, रात्री १:३० वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीची भीषणता येवढी होती की, यात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. यामध्ये फॅक्टरीत असलेले ५० ते ६० लाख रुपयांचे केमिकल जाळल्याची माहीती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मूर्तीजापूर,कारंजा, दयार्पूर नगर पालिकेचे अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुध्दा आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या आगीत कुठलेही जीवित हानी झाली नाही. नागपूर येथील डॉ. अजय चांदुरे व दिपाली चांदुरे यांच्या मालकीची असलेली फॅक्टरी जळून खाक झाल्याने अडीच कोटी रुपयांचे वर नुकसान झाल्याचे डॉ. अजय चांदुरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
मी व माझी पत्नी दिपाली या तनिष्क गम पॉलीमर फॅक्टरीचे भागीदार मालक आहोत. फॅक्टरीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने फॅक्टरी मधील मशीन, फर्निचर, पॅकिंग साहीत्य येवढेच नव्हे तर संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाल्याने अडीच कोटीचे वर नुकसान झाले आहे.
- डॉ. अजय चांदुरे
मालक, तनिष्क पॉलीमर फॅक्टरी