५३ कोचिंग क्लासेस, ११ होस्टेल्सला अग्निशामक दलाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 03:09 PM2019-04-28T15:09:55+5:302019-04-28T15:10:03+5:30
अकोला: शहरातील ५३ कोचिंग क्लासेस आणि ११ विद्यार्थ्यांच्या होस्टेल्सला अकोला महापालिकेच्या अग्निशामक दलाने नोटीस बजावली आहे. आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेसंबंधी ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
अकोला: शहरातील ५३ कोचिंग क्लासेस आणि ११ विद्यार्थ्यांच्या होस्टेल्सला अकोला महापालिकेच्या अग्निशामक दलाने नोटीस बजावली आहे. आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेसंबंधी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. अकोला महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. नोटीसची अवहेलना केल्यास वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यासोबतच इमारतीला सील लावण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अधिनियमांच्या पोटकलमान्वये नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. ज्या क्लासेस आणि होस्टेल्सला नोटीस दिल्या गेल्या, त्या ठिकाणी तपासणीत त्रुटी आढळल्यात. इमारतींच्या उंचीवर आणि व्यावसायिकतेवर प्रश्न उपस्थित करून अग्नी प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना लागू असल्याचे सांगण्यात आले आहे. नियम आणि उपाययोजनांचे पालन न करणे यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. अधिनियम कलम ६ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत विचारणा करण्यात आलेल्या संदर्भातील दस्तऐवज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.