सिमेंट मार्ग बांधकामाने केला अग्निशमन कार्यालयाचा खोळंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:08 PM2018-11-11T13:08:19+5:302018-11-11T13:09:23+5:30
तब्बल सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या या कामामुळे मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती या मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू झाले असून, एका बाजूचा काही भाग बांधला गेला आहे; मात्र उर्वरित दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या या खोदकामामुळे मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. पर्यायाने मनपा अग्निशमन दलास त्यांच्या सात गाड्या समोरच्या पोलीस वसाहत आणि नवीन रस्त्यावर ठेवण्याची वेळ आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर पंचायत समितीपर्यंतच्या काँक्रिट मार्गाचे बांधकाम सुरू झाले. राणी महल आणि बागेच्या देवीच्या बाजूने हा रोड तातडीने तयार केला गेला. दरम्यान, राणी सती मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच्या नाल्यावर स्लॅब टाकायचा असल्याने आणि मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे या मार्गाचे बांधकाम रखडले असून, त्याचा त्रास मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलास होत आहे. जर कुठे आग लागली किंवा अपघाती घटना घडली, तर अग्निशमन दलाच्या गाड्यांना येथून काढणेदेखील जमणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अग्निशमन दल विभागाने दोन गाड्या मार्गावर तर इतर तीन गाड्या समोरच्या देवी पोलीस लाइनच्या पोलीस वसाहतीच्या पटांगणात ठेवल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने या मार्गाचे बांधकाम केल्यास अडचण दूर होण्याची शक्यता आहे; मात्र अजूनही या घटनेची नोंद प्रशासनाने घेतलेली नाही.
आमच्याकडे एकूण सात गाड्या असून, त्यातील दोन गाड्या रस्त्यावर आणि तीन गाड्या पोलीस वसाहतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तातडीच्या प्रसंगी धावता यावे म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
-प्रकाश फुलंबकर, प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग, मनपा, अकोला.
/>