आपोतीत अग्नीतांडव : ४ ते ५ घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:28 PM2019-03-31T16:28:03+5:302019-04-01T12:25:57+5:30
आपातापा (अकोला) : येथून जवळच असलेल्या आपोती बु येथे ३१ मार्च रोजी दुपारी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.हवेचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले.
आपातापा/बोरगाव मंजू (अकोला): येथून जवळच असलेल्या आपोती बु. येथे ३१ मार्च रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हवेचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. अर्ध्या गावात ही आग पसरल्याने जवळपास ४ ते ५ घरे व ८ ते ९ गुरांचे गोठे जळून खाक झाल्याने ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अकोला येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत दोन लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गावाच्या टोकाला असलेल्या माणिक तºहाळे यांच्या घराजवळून विद्युत लाइन गेलेली आहे. याच विद्युत तारेजवळ एक वृक्ष आहे. रविवारी दुपारी वृक्ष तारांवर आदळल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतातून परतत असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची एकच तारांबळ उडाली. घरामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्याने ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु हवेच्या जोराने आग पाहता पाहता चार ते पाच घरे तसेच ८ ते ९ गुरांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली. या आगीत घरातील कडधान्य, कपडे, गुरांचा चारा, कापूस, हरभरा, सोयाबीन आदींसह इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती अकोला येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. हवेचा वेग जास्त असल्याने आग संपूर्ण गावात शिरण्याची भीती निर्माण झाली होती. चार अग्निशमन बंब वेळीच घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. अकोलाचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी तसेच बोरगाव मंजू पोलिसांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी गावाशेजारच्या नाल्यातील पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पंचनामा केल्यानंतर किती नुकसान झाले, हे स्पष्ट होणार आहे.
अनेकांचा संसार उघड्यावर
या आगीत राहत्या घरासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. गावात शेतकरी आणि शेतमजुरांचे वास्तव्य आहे. अनेकांनी भाव वाढतील, या आशेने घरामध्ये कापूस, सोयाबीन आणि हरभरा ठेवला होता. रविवारी लागलेल्या आगीत धान्य जळून खाक झाले. अनेक शेतमजुरांनी वर्षभराचे गहू, ज्वारी घरामध्ये भरून ठेवले होते. अचानक लागलेल्या या आगीत ते जळाल्याने पाच ते सहा कुुटुंंबांचा संसार उघड्यावर आला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या ग्रामस्थांचे झाले नुकसान
आगीत साहित्य व धान्य जळाल्याने माणिक तराळे यांचे ३० हजारांचे, चिंतामण तराळे यांचे ४५ हजाराचे, ईश्वरदास तराळे यांचे ६० हजारांचे, हरिभाऊ तराळे यांचे ३० हजारांचे, देवीदास शा. तराळे यांचे ६० हजारांचे, रामा तराळे, हरिभाऊ किसन तराळे यांचे ३० हजाराचे, शिवानंद तराळे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले. पंजाबराव भिकाजी तराळे यांच्या घरामधील २० क्विंटल कापूस, १० क्विंटल हरभरा, ४ क्विंटल गहू जळून खाक झाला. याव्यतिरिक्त गुरांच्या गोठ्यामध्ये ठेवलेले कुटार, शेतीपयोगी साहित्य जळाले. घुसर मंडळाच्या अधिकारी आणि तलाठ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.
सैरभैर पळत होते ग्रामस्थ
भरदुपारी अचानक लागलेल्या आगीने हवेच्या दिशेने पेट घेणे सुरू केले. गावात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घरात उपलब्ध असलेल्या पाण्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ग्रामस्थांनी लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी एकच धावपळ केली. त्यावेळी आग वेगाने पसरल्याने ग्रामस्थांना आपले साहित्य घरातून बाहेर काढण्यासाठी वेळही मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अग्निशामक दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!
गावाच्या पश्चिमेस असलेल्या हनुमान मंदिराजवळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग पाहता पाहता अर्ध्या गावात पोहोचली होती. त्यावेळी हवेचा वेग गावाकडे असल्याने आग हळूहळू संपूर्ण गावात पोहोचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती; मात्र अकोला महानगरपालिकेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांच्या तीन तास अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आपातापा, आपोती खुर्द, मारोडी, खोबरखेड, एकलारा येथील ग्रामस्थांनीही धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी आपोती बु. येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. ते आग विझेपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
मान्यवरांनी दिली भेट!
अग्नी तांडवाची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी आपोती बु. येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. प्रा. अंजलीताई आंबेडकर, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जि. प. सदस्य प्रतिभा अवचार यांनी आपोती येथे भेट पाहणी केली.