फटाका गोदामाला भीषण आग
By admin | Published: July 7, 2016 02:26 AM2016-07-07T02:26:25+5:302016-07-07T02:26:25+5:30
शिलोडानजीकची घटना, फटाके जळून खाक.
अकोला - आकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिलोडा गावानजीकच्या जंगलात असलेल्या बंदूकवाला यांच्या फटाका गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या आगीत गोदामातील फटाके जळून खाक झाले असून, मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मोहम्मद अली रोडवरील बंदूकवाला फटाका शॉपचे मालक अलीभाई यांचे शिलोडा शेतशिवारामध्ये फटाक्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामातील फटाक्यांना बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन बंब पाण्याद्वारे ही आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बंदूकवाला यांचे फटाक्यांचे मोठे गोदाम असून, सदर गोदाम वस्तीपासून दूर जंगलात असल्याने जीवितहानी टळली. मात्र, या गोदामातील सर्वच प्रकारचे फटाके फुटल्याने विविध प्रकारचे कर्णकर्कश आवाज शिलोड व या परिसरातील नागरिकांना येत होते. या आगीची माहिती मिळताच आकोट फैलचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते. अग्निशमन विभागाचे रमेश ठाकरे व त्यांच्या कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. या आगीत बंदूकवाला यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, अधिकृत आकडा त्यांच्याकडून प्राप्त झाला नाही.