महापालिका कार्यालयात लावणार अग्निराेधक सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:53+5:302021-01-14T04:15:53+5:30
भंडारा येथील दुर्दैवी घटनेत निष्पाप काेवळ्या जीवांचा हकनाक बळी गेला. या घटनेमुळे सरकारी यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र दिसत ...
भंडारा येथील दुर्दैवी घटनेत निष्पाप काेवळ्या जीवांचा हकनाक बळी गेला. या घटनेमुळे सरकारी यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात प्रशासकीय कार्यालयांमधील अग्निराेधक सुरक्षा यंत्रणाच कालबाह्य असल्याचे समाेर आले आहे. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन असाे वा इतर महत्त्वाच्या कार्यालयांतील अग्निराेधक सुरक्षा यंत्रणांची (सिलिंडर) मुदत संपुष्टात आल्याचे चित्र आहे. महापालिकेत आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनासह उपायुक्त, सहायक आयुक्त, शिक्षणाधिकारी, नगर सचिव यांच्या कार्यालयांतील तसेच महत्त्वाचे विभाग समजल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, जलप्रदाय विभाग, मालमत्ताकर विभाग, नगररचना विभागातील अग्निराेधक सिलिंडरची मुदत संपुष्टात आली आहे. भंडारा येथील घटनेनंतर या प्रकाराची उपायुक्त वैभव आवारे यांनी दखल घेत नवीन सिलिंडर लावण्याचा आदेश जारी केला आहे.
अग्निशमन विभाग कामाला
महापालिकेत आयुक्तांच्या कक्षासह इतर महत्त्वाच्या विभागांतील सुमारे १६ सिलिंडरची मुदत मार्च २०२० मध्ये संपुष्टात आली आहे. नऊ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या सिलिंडरकडे प्रशासन व अग्निशमन विभागाचे दुर्लक्ष कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे. हा प्रकार पाहता उपायुक्त वैभव आवारे यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभाग कामाला लागला असून सिलिंडर बदलण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
वाणिज्य संकुल, हाॅटेल, रेस्टाॅरंट बारची तपासणी
मनपाच्या अग्निशमन विभागाकडून लवकरच शहरातील वाणिज्य संकुले, खासगी हाॅस्पिटल, मंगल कार्यालये, हाॅटेल, लाॅज तसेच रेस्टाॅरंट बार आदी ठिकाणी संबंधितांनी अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा उभारली अथवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.