मालठाणा येथे घरांना आग!
By Admin | Published: April 7, 2017 12:44 AM2017-04-07T00:44:08+5:302017-04-07T00:44:08+5:30
तेल्हारा : मालठाणा बु. येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक घरांना आग लागली. या आगीत चार घरातील साहित्य तसेच १० शेळ््या ठार झाल्या.
दहा शेळ्या ठार : चार घरातील साहित्य खाक
तेल्हारा : तालुक्यातील मालठाणा बु. येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक घरांना आग लागली. या आगीत चार घरातील साहित्य तसेच १० शेळ््या भाजल्या गेल्याने ठार झाल्या.
अडगावजवळ असलेल्या मालठाणा बु. येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अचानक आग लागली. ही आग पसरत गेल्याने यामध्ये नागोराव पवार यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच घरातील दहा बकऱ्या भाजल्या गेल्याने ठार झाल्या. उत्तम गवई यांच्या घरातील सहा क्विंटल हरभरा व घरातील सर्व साहित्य, दादाराव गवई यांच्याही घरातील सर्व साहित्य जळाले. डॉ.पंजाबराव धामोडे, दादाराव गवई, विशाल घ्यारे, संतोष धामोडे आदींनी ग्रामस्थांसह आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश आले नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन बंबांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे, तलाठी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ही आग गावातील खताला लागून, त्यानंतर घराला लागली असावी, असा अंदाज आहे.
पाणीटंचाईमुळे जास्त नुकसान
गावात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई आहे. पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी मिळाले नाही. त्यामुळे, नुकसान जास्त झाले. यापूर्वीही गावात आग लागल्याची घटना घडली आहे. गंगुबाई पवार या महिलेला आग लागल्याचे कळताच त्या शेतातून परत आल्या. बकऱ्या जळालेल्या पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.