कमल सोसायटीमध्ये घराला आग
By admin | Published: January 6, 2017 02:42 AM2017-01-06T02:42:58+5:302017-01-06T02:42:58+5:30
स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक
अकोला, दि. ६- सर्वोपचार रुग्णालयासमोरील कमल सोसायटीत राहणारे अशोक लोढाया यांच्या घरामध्ये अचानक आग लागली. आगीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून धगधगत्या आगीतून स्वयंपाकघरातील दोन गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळविले. अन्यथा सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
कमल सोसायटीत राहणारे अशोक लोढाया यांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटरने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच आगीने उग्र स्वरूप धारण केले.
आग घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना, अग्निशमन दलाचे कर्मचारी धुपेंद्रसिंह पवार यांचे लक्ष स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरवर गेले. सिलिंडरसुद्धा आगीच्या टप्प्यात येणार होते; परंतु त्यापूर्वीच धुपेंद्रसिंह यांनी जीवाची पर्वा न करता, दोन्ही सिलिंडर घराबाहेर आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी वित्त व प्राणहानी झाली असती. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असावी, असा अंदाज आहे. आगीमध्ये घरातील हजारो रुपयांचे साहित्य जळाले. रात्री उशिरापर्यंंत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.