अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 07:15 PM2020-02-11T19:15:43+5:302020-02-11T19:15:49+5:30
दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत.
अकोला : शहरातील मध्यभागी असलेल्या जैन मंदिराजवळील भाजीबाजाराला मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत. आगीच्या या घटनेमुळे या छोट्या भाजी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तिन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
आगीच्यी घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहता आणखी एका बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आगीची तिव्रता पाहता इतर दुकाने वाचविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी. या आगीमध्ये भाजीपाला, मिरची त्यासोबतच कांदे, बटाटे, फळे आणि देवपूजेचे साहित्य विक्री करणारे छोटी दुकाने यांचे नुकसान झाले आहे.
दीड ते दोन तासानंतर अग्निशमन दलांनी ही आग आटोक्यात आणली. घटनास्थळावर भाजीविक्रेते आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ही गर्दी पाहता कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ही आग नेमकी लागली कशामुळे याचा शोध अग्निशमन दल घेत आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी नाही झाली.